श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक मंडळातर्फे अग्नीशमन दलातील कर्मचाऱ्यांचा  सन्मान 

मंडळांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव यशस्वी ; रश्मी शुक्ला

पुणे : मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत तत्परतेने काम करणाऱ्या अग्नीशमन दलातील कर्मचारी,जीवनरक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलाचे कर्मचारी व जीवनरक्षक यांचे औक्षण केले. उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष होते.

सामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये सतत संवाद होत असतील तर नागरिकांचे प्रश्न समजण्यास मदत होते. गणेशोत्सवादरम्यान मंडळांना भेट देताना त्यांचे प्रश्न समजले. पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांना सहकार्य केल्यामुळे गणेशोत्सव शांततेत पार पडला. त्याचबरोबर पुणेकरांनी देखील चांगल्या पध्दतीने सहकार्य केले, असे मत पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, शैलेश टिळक, मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर,  प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, नितीन पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते. रश्मी शुक्ला म्हणाल्या, विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी देशभरातून अनेक नागरिक येतात. यावेळी अत्यंत तणावाचे वातावरण असते. पोलीस कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी असे अनेक लोक यावेळी तत्परतेने आपले कर्तव्य बजावित उत्सव शांततेने पार पडावा यासाठी प्रयत्नशील असतात. अशा कर्मचाºयांचा सन्मान हा मोलाचा आहे.

विवेक खटावकर म्हणाले, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि जीवनरक्षक यांचा सिंहाचा वाटा असतो. नागरिकांचे संरक्षण करण्याचे मोलाचे कार्य ते करीत असतात. अशा व्यक्तींचा सन्मान मंडळातर्फे दरवर्षी करण्यात येतो. पुण्याच्या १२५व्या गणेशोत्सव वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या सहभागाकरीता पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा सन्मान यावेळी करण्यात आला, त्यांच्यावतीने शैलेश टिळक यांनी सन्मान स्विकारला.