राष्ट्रवादीची आणखी एक रणरागिणी करणार शिवसेनेत प्रवेश ?

shivsena ncp

करमाळा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. अनेक कॉंग्रस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करून आगामी सत्तेची फळे चाखण्यासाठी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. अशाचं पद्धतीने करमाळा राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल याही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 20 ऑगस्टला रश्मी बागल शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचं सांगितल जात आहे.

19 ऑगस्टला बागल गटाने कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. 20 तारखेला शिवसेना प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर कार्यकर्त्यांना या बैठकीची नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. ‘शिवबंधन हाती बांधण्याची वेळ आली आहे. याविषयीची सविस्तर चर्चा झाली असून शिवसेना आपल्याला तिकीट द्यायला तयार आहे. यावर रश्मी दिदींना अनुमती देण्यासाठी बागल गटावर प्रेम करणाऱ्या, खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या, निष्ठावान आणि प्रामाणिक पणे कोणत्याही परिस्थितीत बागल गटाला साथ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी दिनांक १९/८/२०१९ रोजी सकाळी १० वाजता बागल संपर्क कार्यालयात यावे. सर्वांना ही नम्र विनंती आहे.’, अशी पोस्ट रश्मी बागल यांचे धाकटे बंधू दिग्विजय बागल यांनी फेसबुकवर टाकली आहे.

दरम्यान करमाळा तालुक्याचं नाव सबंध महाराष्ट्रात ज्यांनी गाजवले, ज्यांच्या रूपाने करमाळा तालुक्याला पहिल्यांदा लाल दिवा मिळाला, असे कै. दिगंबर बागल आणि माजी आ. शामलताई बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांची राजकीय जडणघडण मोठी रंजक आहे. २० व्या वर्षी रश्मी बागल यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या राजकारणाला मकाई सहकारी साखर कारखान्यापासून सुरवात केली. मात्र हाच साखर कारखाना आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे अंतिम उपाय म्हणून रश्मी बागल सत्ताधारी शिवसेनेकडे धाव घेत असल्याची चर्चा आहे.