राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेना प्रवेश केला. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या मुहूर्तावर देखील सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये करमाळ्याच्या रश्मी बागल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

दरम्यान रश्मी बागल यांच्यासोबत इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित या आज शिवसेना प्रवेश केला आहे. गावित यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला दिला होता त्यानंतर त्यांनी आज शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार सुनील तटकरे यांचेही नव चर्चेत आहे.