fbpx

पणन संचालकांकडून न्यायालयाचा अवमान, रश्मीदीदींचा हल्लाबोल

करमाळा : करमाळ्यातील पंचायत समितीवरचा जगताप गटाचा डौलाने फडकणारा झेंडा ज्या बगल गटाने हटविला त्या बागल गटाला मोठा धक्का बसला आहे. दिग्विजय बागल व जगताप गटाचे समर्थक सदाशिव पाटील या दोघांचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद राज्याचे पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी अपात्र ठरवत रद्द करण्याचा निकाल दिला आहे. दिग्विजय बागल यांच्या संचालक पदावर गंडांतर आल्याने बागल गटाची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.

बाजार समितीचे संचालक दिग्विजय बागल यांचे संचालकपद पणन संचालकांनी अपात्र ठरवित रद्द करण्याचा निर्णय १९ जुलै रोजी दिला. मात्र, या प्रकरणी दोन दिवस अगोदर १७ जुलै रोजी उच्च न्यायालयाने संचालकपद ‘जैसे थे’ ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. असे असताना राज्याच्या पणन संंचालकांनी निर्णय देऊन उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. राज्याच्या पणन संचालकांनी राजकीय दबावापोटी हा निर्णय दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी व्यक्त केली आहे.