fbpx

इतिहास घडणार,रावसाहेब दानवे पडणार ?

संजय चव्हाण/पुणे :- सतत वीस वर्ष सत्तेत असलेल्या खासदार रावसाहेब दानवे यांनी कोणत्याच प्रकारचा जिल्ह्याचा विकास केला नाही. जो विकास केला, तो गेल्या चार वर्षात झाला, तो ही केवळ भोकरदनपुरता मर्यादित राहिला. कोणतेही मोठे प्रकल्प जिल्ह्यात आणले नाही, आहे ते उद्योग स्थालांतरीत होत आहे आता बदल हवा, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत असून काँग्रेस पक्ष मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झाला, तर इतिहास घडेल, असेही सांगत आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील काही अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. निवडणुक जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेचे राज्यमंत्री आणि जालन्यातील मोठे नेते अर्जून खोतकर यांनी खासदार दानवे यांना वध अर्जूनाच्या बाणाने करणारच असे गर्जना करत दानवे यांच्या विरोधात वातारवण निर्माण केले. रावसाहेब दानवे यांचा पराभव निश्चित होणार असे असताना शिवसेना-भाजप युती झाली आणि दानवे यांचा जीव भांड्यात पडला. यानंतरची खरी कसरत होती, ती नाराजांचे मन वळवण्याची, यात काही प्रमाणात दानवे यांना यश आले असले, तरी मतदारांचे काय हा प्रश्न आजही तसाच असल्याचे चित्र आहे.

युती झाली, नेत्यांचे मनोमिलन झाले, मात्र मतदारांची मन काही या युतीकडे वळाली नसल्याचे चित्र मतदारांमध्ये दिसले. निवडणुकीपूर्वी जवळपास ५७ टक्के मतदार दानवे यांच्या विरोधात उभा होता, त्यात आज काही प्रमाणात घट झाली असली, तरी तो पूर्णत: युतीच्या बाजून झूकलेला दिसत नाही. त्यामुळे ही निवडणुक एकूणच दानवे आणि युतीसाठी प्रतिष्ठेची लढाई झाल्याचे चित्र आहे.

दानवे विरोधात सुप्त लाट
सलग वीस वर्ष जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना खासदार मा. रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणताही निधी आणला नाही. तसेच खासदार निधी वापरला नाही. जो वापरला तो खोटी कामे दाखवून वापरला असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याप्रमाणे जालना जिल्ह्याचा विकास करण्याची वल्गना करणारे काहीच करू शकले नाही. आहे ते उद्योग स्थालांतरित होण्यास भाग पाडले. बेरोजगारांना रोजगार नाही. सुशिक्षित ग्रामीण तरूण गावागावाने बेरोजगार फिरताना दिसत आहेत. यासर्वांमध्ये खासदार साहेबांनी आमच्यासाठी काय केले, असा प्रतिप्रश्न विचारत आहेत. अनेक गावामध्ये खासदार आपल्या कारकिर्दित फिरकलेच नाही, त्यामुळे किती वेळा त्यांना मतदान करायचे. आता बदल हवा, नवीन चेहरा जिल्ह्यासाठी हवा आणि विकासाच्या मुदयावर बोलणार व चालणार हवा, अशी अपेक्षा ही व्यक्त करत आहेत.

शिवसेनेचा आतून काँग्रेसला पाठिंबा ?
शिवसेना – भाजप युती झाली असली, तरी कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये युती झाल्याचे चित्र नाही. नेत्यांना आपले मनोमिलन केले, मात्र आमचा विचार केला नाही, असे शिवसैनिक बोलतांना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी आपल्याच नेत्यांनी विरोधात मतदान करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीची भूमिका संशयीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार राजेश टोपे हे आघाडीच्या प्रचारात सक्रीय होतांना दिसत नाहीत. अनेक संभामध्ये ते गैरहजर रहात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे, हे मतदारांना कळत नसल्याची चर्चा आहे.