रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती, दोन अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निलंबित

raosaheb danawe

जालना : जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद इथल्या जनसंपर्क कार्यालयाची कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय झाडाझडती केल्याप्रकरणी दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरुन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई केली.

कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी ११ जूनला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदा झाडाझडती घेतली. अशाच प्रकारे पोलिस खात्यात जनमानसात प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत होऊन कर्तव्यात बेकायदा व बेशिस्तीचे वर्तन केले, असा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती २ पोलिस उपनिरीक्षक व ३ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तिडके, शाबान तडवी अशी त्यांची नावे आहेत.

यावेळी या पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या, अशी तक्रार रावसाहेब दानवे यांनी केली होती. . तपासणीत काय साध्य केले, काय निष्पन्न झाले, याचा पोलिस खात्याने तत्काळ खुलासा सादर करावा, अशी लेखी मागणी दानवे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली होती.

महत्त्वाच्या बातम्या