रावसाहेब दानवे चुकले आणि सावरले, म्हणाले पाकिस्तानने देशातील ४० अतिरेकी मारले

raosaheb danve patil

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज सोलापुरातील आपल्या भाषणात मोठी चूक केली. पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना, पाकिस्तानने देशातील ४० अतिरेकी मारले, असं विधान त्यांनी केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दानवेंनी शहीद जवानांचा अपमान केल्याची तीव्र भावना नेटकरी व्यक्त करताहेत. या विधानावरून विरोधी पक्षांनीही दानवे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दानवेंचा याबाबतच व्हिडीओ शेअर करुन त्यांना हेच का भाजपाचे बेगडी देशप्रेम? असा प्रश्न विचारला आहे. परंतु आपण चुकल्याचे दानवे यांना समजताच त्यांनी लगेच सावरत पाकिस्तानने देशातील सैनिकांना मारले असे सांगितले.

सोलापूरातील हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो, अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. यावेळी बोलत असताना दानवेंची जीभ घसरली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रावसाहेब दानवेंचा एका व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामध्ये हेच का भाजपाचे ब्रिगेडी देशप्रेम ? असे म्हटले आहे. तसेच देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी अतिरेकी ठरवले असे या ट्विटरवर म्हटले आहे.