स्वस्त मिळतात तर घेऊ आणि कव्हर लाऊन वापरू ; दानवेंच्या प्रचाराला विद्यार्थ्यांनी मारलं फाट्यावर

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे राजकीय नेते आपल्या प्रचारासाठी नामी शकला लढवत आहेत. त्यात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर हद्दच ओलांडली आहे. रावसाहेब दानवेंनी शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवरच आपल्या जाहिराती छापल्या आहेत. दानवेंनी या वह्यांची किंमत 18 रुपये प्रति नग, म्हणजेच 216 रुपये डझन अशी ठरवून दिली आहे. आता दानवेंच्या या कृतीवर सगळ्याच्या स्तरातून टीका होत आहे.

दानवेंनी या वह्यांचा वापर एकप्रकारे राजकीय प्रचारासाठी केला आहे. शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या कामाचा लेखाजोखा कळावा, या उद्देशाने गेल्या चार वर्षातील कामाची यादीच त्यांनी वह्यांच्या पुठ्ठ्यांवर छापली आहे. दानवे महाशयांनी हजार दोन हजार नाही तर तब्बल एक लाख वह्या छापल्या आहेत.

मात्र, दानवेंच्या या आयडियाच्या कल्पनेला विद्यार्थ्यांनी अक्षरशः फाट्यावर मारलं आहे. दानवे जरी शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवरून प्रचार करण्याचा विचार करत असले तरी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या एक पाउल पुढे जात विद्यार्थ्यांनी या वह्यांना कव्हर लावत वापरण्याचा निर्णय केला आहे. स्वस्त वह्या मिळतात तर घेऊ आणि कव्हर लाऊन वापरू असे विद्यार्थी म्हणत आहेत.