fbpx

सोनिया गांधींच भाषण म्हणजे पुस्तकात वाचून बनवलेली खिचडी : रावसाहेब दानवे

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर पकडला आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका – टिप्पणी , आरोप – प्रत्यारोपच्या फैरी झडताना दिसत आहेत. आज लातूर येथे झालेल्या एका प्रचार सभेमध्ये भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सोनिया गांधी चांगल्या आहेत पण त्यांची देश चालवण्याची कुवत नाही असा टोला त्यांनी हाणला आहे.

यावेळी दानवे म्हणाले की, पुस्तक वाचून खिचडी होत नाही, तसे चिठ्ठी वाचून देश चालविता येत नाही. माझ्याच घरात पत्नीला स्वयंपाक येत नसल्याने मी तिला दोन महिने माहेरी पाठवून स्वयंपाक शिकून परत ये म्हणालो. दोन महिन्यांनी ती आली. मी तिला खिचडी करायला सांगितले. तिने पुस्तक काढले. त्यात लिहिल्याप्रमाणे अडीचशे ग्रॅम तांदूळ, अडीचशे ग्रॅम डाळ, मीठ, हळद, मिरची टाकले. पातेले झाकून ठेवले. अर्धा तास वेळ दिला. उघडून पाहिले तर खिचडी शिजली नव्हती. कारण स्टोव्हच सुरू केला नव्हता, असे म्हणत दानवे यांनी वाचून केल्या जाणाऱ्या भाषणाची खिल्ली उडविली.