‘पवारांचा दौरा प्रचारासाठी नसून पडझड रोखण्यासाठी’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कात टाकावी यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडल्यानंतर देखील पवारांच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र याच दौऱ्यावर आता केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी चांगलच तोंडसुख घेतलं आहे.

पवारांचा महाराष्ट्र दौरा प्रचारासाठी नसून हा पक्षातील पडझड रोखण्यासाठी आणि अस्तित्व टीकून ठेवण्यासाठी असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारसभा मेळावे होत असताना राष्ट्रवादीच्या बंद दाराआड बैठका होत आहेत. आता पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र ते प्रचारासाठी नव्हे तर पक्षातील पडझड रोखण्यासाठी फिरत असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ दूर कऱण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले असून त्यांना प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यावर आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.

तर, अजुनही युतीत येणाऱ्या नेत्यांचे पक्षप्रवेश थांबलेले नाहीत. भाजप-शिवसेनेचे मेळावे खुल्या मैदानात होत आहे.मात्र राष्ट्रवादीच्या सभा देखील बंद सभागृहात होत असल्याची टीका दानवे यांनी केली. यावर आता राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या