पुणे : आज सर्व विरोधक भाजपला हरवण्यासाठी एकत्र येत आहेत, मात्र या सर्वांना पुन्हा एकदा मोदी सत्तेत आल्यास पुढील 50 वर्षे आपल्याला सत्ता मिळवता येणार नाही ही भीती आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन पंतप्रधान होण्यासाठी दिल्लीकडे जायला निघाले आहेत. परंतु यांचा नारा हा आवो चोरो बांदो भारा, आधा तुम्हारा आधा मेरा अशी असल्याची घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी आज शक्तिकेंद्र प्रमुख, बुथकेंद्र प्रमुखांच्या बैठकीला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे, खा. अमर साबळे यांच्यासह आमदार, पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.
मी 46 मतदारसंघाचा दौरा केला आहे, मागच्या लोकसभा निवडणुकीत आपण 42 जागा जिंकल्या यावेळी 43 जागा जिंकू. असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.