नाना पटोले काँग्रेसमध्ये जाणार हे भाजपला आधीपासून माहीत होतं – रावसाहेब दानवे

नेतृत्वावर आरोप करून पक्ष सोडणे ही नाना पटोले यांची जुनी सवय- दानवे

टीम महाराष्ट्र देशा- नाना पटोले काँग्रेसमध्ये जाणार हे भाजपला आधीपासून माहीत होतं तसेच नेतृत्वावर आरोप करून पक्ष सोडणे ही नाना पटोले यांची जुनी सवय असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे . भाजपमध्ये हुकूमशाही नाही. पक्षाचे खासदार, नेत्यांची मुस्कटदाबी होत नाही असा दावा देखील दानवे यांनी यावेळी केला आहे . त्र्यंबकेश्वर, इगतपुरी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पटोले यांनी खासदारकीचा दिलेला राजीनामा आणि पक्ष नेतृत्वावर सातत्याने केलेले आरोप यावर भाष्य केले.

काय म्हणाले रावसाहेब दानवे ?
खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता नसून प्रतिमा सावरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे आंदोलन म्हणजे केविलवाणा प्रकार असून नाना पटोले काँग्रेसमध्ये जाणार हे भाजपला आधीपासून माहीत आहे. भाजपमध्ये कोणत्याही नेत्याची मुस्कटदाबी होत नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या राजकीय भीतीपोटी पटोले अस्वस्थ होते. पटेल आले तरी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या नावाने पक्ष सोडणे ही पटोलेंची नौटंकी आहे. नेतृत्वावर आरोप करून पक्ष सोडणे ही नाना पटोले यांची जुनी सवय आहे.