Breaking- अखेर रणजितसिंहांच्या हाती भाजपचा झेंडा, सोलापूर जिल्हा बनणार भाजपचा बालेकिल्ला ?

टीम महाराष्ट्र देशा: रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा झेंडा त्यांच्या हाती देत भाजप प्रवेश दिला आहे. दरम्यान, मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला आणखीन बळ मिळाले आहे. तर राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोण आहेत रणजितसिंह मोहिते पाटील?

रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी राष्ट्रावादी युवक कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. सर्वात तरुण वयातील राज्यसभा खासदार म्हणून देखील यांना ओळखले जाते. जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेचेआमदार पद रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळले आहे.

मोहिते पाटलांची राष्ट्रवादीवर नाराजी का ?

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रावादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर मोहिते पाटील पित्रा – पुत्रा पैकी एकाला उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. परंतु पक्षाने अद्याप माढ्यासाठी उमेदवार घोषित केलेला नाही. त्यामुळे सोलापूरमधील मोहिते पाटील समर्थकांत नाराजीचे वातावरण आहे. तसेच मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने रणजितसिंह यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

माढ्यात कसे असणार राजकीय गणित

रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माढ्यातून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून मोहिते पाटीलांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र स्वतः शिंदे हे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. तर शरद पवार यांनी सुरुवातीपासून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शकता जास्त आहे.Loading…
Loading...