रणजीत देशमुख यांची मुलाला घराबाहेर काढण्याची पोलिसांकडे मागणी

नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांनी आपला मुलगा डॉ अमोल देशमुख यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. अमोल देशमुख आणि काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख हे भाऊ आहेत. मुलगा डॉ अमोल देशमुख बळजबरीने घरात राहात असल्याचं रणजीत देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

”माझा मुलगा डॉ अमोल देशमुख याने गेल्या काही महिन्यांपासून माझ्या परवानगीशिवाय, माझ्या मालकीच्या सिव्हिल लाईन्स येथील घरात बळजबरीने राहणे सुरु केले आहे. मी त्याला माझ्या संपत्तीतून दोन बंगले राहायला दिले आहेत. मात्र तरी तो त्याच्या कुटुंबियांसह तिथे न राहता माझ्याच घरी बळजबरीने शिरुन राहत आहे.

रोज घरी येणारे त्याचे मित्र आणि कार्यकर्त्यांमुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे, माझी प्रकृती ढासळत आहे, रक्तदाब वाढला आहे.हे त्रास थांबविण्याकरिता 4 मे रोजी मी माझ्या घराच्या दाराला दोन कुलूप लावले होते. मात्र, 5 मे रोजी डॉ अमोल देशमुखने ते दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश केला.त्यामुळे मजबुरीने आता मी माझ्या घरासमोर 4 गार्ड्स/सुरक्षा रक्षक ठेवले आहेत.जर पोलिसांनी माझे घर रिकामे करुन दिले नाही, तर इथे काही अघटिक घडू शकते’ असा इशाराही यावेळी रणजित देशमुख यांनी दिला.