महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी

महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली - स्वाभिमानी

मुंबई :  अतिवृष्टीमुळे मागीलवर्षी पेक्षा यावर्षी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत सरकारतर्फे अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा केली. या मदतीत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर. ही मदत २ हेक्टर मर्यादेत असणार आहे.

दरम्यान, सरकारने जी मदत केली आहे त्यावर स्वभिमानीचे नेते रणजित बागल यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काल महाविकास आघाडीसरकारने अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणुन जी घोषणा केलेली आहे ती म्हणजे अक्षरश राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडुन केलेली चेष्टा आहे.संपुर्ण हंगाम वाया गेला आहे.शेतकऱ्यांना निसर्गाने हतबल केले असताना या सरकारने जी केलेली मदत आहे ती अत्यंत शुल्लक स्वरूपाची आहे.

पुढे ते म्हणाले या अत्यंत तोकड्या मदतीतून शेतकऱ्यांचे नुकसान तर भरून निघणारच नाही उलट अतिवृष्टीने खराब झालेली शेतशिवारे यांची दुरूस्ती देखील शक्य नाही. सरकारकडे आर्थिक चणचण आहे हे मान्य आहे परंतु कोणतेही सरकार कितीही अडचणीत असले तरी शेतकरी हा खरा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो अडचणीत असेल तर अर्थव्यवस्था देखील ताळ्यावर राहणार नाही म्हणूनच शेतकऱ्यांना भरीव मदत देवुन त्यांना दिलासा देणे गरजेचे होते मात्र महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परखड मत आहे.लवकरच सरकारने भरीव मदत न केल्यास राज्यभरातील शेतकर्यांसोबत स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल व शेतकर्यांच्या प्रचंड रोषाचा सामना या सरकारला करावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या