सिंधुदुर्ग : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याला दोन दिवस होत नाहीत, तोच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का दिला होता. आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातच भाजपला खिंडार पाडण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सहा नगरसेवकांनी एकाचवेळी राजीनामा दिला असून या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं आहे.
याच वरून राजकारण तापल्याचं दिसतय. ‘शिवसेनेला कोकणात उमेदवार तरी मिळावेत म्हणून व्हॅलेंटाईन दिनानिमित्त जुन्या प्रेमाला गिफ्ट दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी हे गिफ्ट स्वीकारावं’, अशी खिल्ली नितेश राणे यांनी उडवली होती.
दरम्यान, यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याची कुवत आज तरी राहिलेली नाही. त्यांनी कितीही गिफ्ट देऊ केली तरी शिवसेनेला त्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी आपल्या मनाचा मोठेपणा किती आहे, तो दाखवून दिला आहे. तुम्ही शिवसेनेशी बेईमानी केली, तरीही तुमच्या मेडीकल काॅलेजचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केला, दुसऱ्या कोणी केला नाही. त्यामुळे नितेश राणेंकडून गिफ्ट स्वीकारण्याची वेळ शिवसेनेवर आजतरी आलेली नाही. मात्र नितेश राणे यांच्यावर ती वेळ लवकरच येणार आहे, असे प्रत्युत्तर राऊत यांनी दिले.
‘राणेंची थोडीतरी लाज राखावी या मोठेपणाने आम्ही भाजप नगरसेवकांचा प्रवेश दोन दिवस पुढे ढकलला. नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या दिवशी सिंधुदुर्गात आले, त्याच दिवशी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाचा हा धक्का आम्ही देऊ शकत होतो. वैभववाडीच्या ज्या नगरसवकांनी प्रवेश केला त्यांनी नितेश राणेंच्या हटवादी पणाला कंटाळूनच केला आहे. अजूनही जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत येतील आणि त्याला कारण यांची दादागिरी आणि हटवादीपणाच कारणीभूत असेल’, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- गणेश नाईक फासे पलटण्याच्या तयारीत; शिवसेनेत गेलेल्या नगरसेविकेची ‘घरवापसी’
- इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना अन् आता कर्णधार कोहलीला आणखी एक धक्का !
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- 2025 सालापर्यंत अपघातांच्या प्रमाणात भारतात 50% घट होणार ?