राणांनी कुणाची तरी सुपारी घेतली असेल- दिलीप वळसे पाटील

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी समर्थन केले आहे. त्यातच राणा दांपत्यानी आज २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या खार परिसरातील घराबाहेर जाम ठोकला आहे. तर दुसरीकडे आज मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करणारच असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे. यावरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्यांना हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी, दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करू नये. त्यांना फारच धर्मा बद्दल आवड असले तर त्यांनी अमरावतीमध्ये आपल्या घरी शांततीत याचे वाचन करावे. मातोश्रीवर जाऊन तिथे विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नये.”, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

तसेच पोलिसांना काय करयचे आहे, हे पोलिसांना माहित आहे. पोलिसांना योग्य कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्या संपर्कात असून परिस्थिती बिघडली असे दाखवण्यात येऊ नये. राणांनी कुणाची तरी सुपारी घेतल्याचे दिसून येत आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून हे चालले आहे. मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर या मागील कारण राणा दांपत्य असणार. असा इशाराही वळसे पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: