अमरावती : काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी नवनीत राणा आणि रवी यांना यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार नवनीत राणा यांनी तोडलेले तारे अदभूत असून आगामी ऑलिम्पिकमध्ये कोलांटउडी हा खेळ ठेवल्यास नवनीत राणा यांना गोल्डमेडल मिळेल याची शंभर टक्के खात्री वाटते, असा टोलाच ॲड. दिलीप एडतकर यांनी नवनीत राणा यांना लगावला आहे. यासह झोमॅटो डिलिव्हरी कपल म्हणूनही हल्लाबोल चढवला.
“राणा दाम्पत्य भाजप नावाच्या झोमॅटो कंपनीचे डिलिव्हरी कपल असून एकाच वेळेस भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन होड्यांमध्ये ते स्वार आहेत. खोटे प्रमाणपत्र खरे ठरवण्यासाठी भाजप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राष्ट्रवादी, असा दुहेरी डाव हे नौटंकी जोडपे खेळत आहे”, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी केला आहे.
राणा दाम्पत्यावर टीका करतानाअॅड एडतकर पुढे म्हणाले की, राणा दाम्पत्याने भाजपची नोकरी स्वीकारली असून सध्या ते रोजंदारीवर आहेत. मुंबईत अटक झाल्यानंतर भाजपने आपल्याला हवी तशी साथ दिली नाही, नोकरीत कायमही केले नाही. म्हणून नाराज असलेल्या जोडप्याने दिल्लीत हनुमान चालीसा पठणाचा “शो” केला खरा परंतु अद्याप त्यांच्या आकांनी त्यांची दखल घेतलेली नाही. म्हणून आता प्रसिद्धीमाध्यमांना या दाम्पत्याने हाताशी धरले आहे.
एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आपण भाजप तर्फे लढणार का, या अनेकवेळा विचारलेल्या प्रश्नाला नवनीत राणा यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळून मी अपक्ष खासदार आहे असा घोषा लावला होता. राष्ट्रवादीच्या कोट्यातून काँग्रेसच्या बळावर त्या निवडून आल्याचे स्पष्ट असताना स्वतःच्या अपक्ष विजयाचा टेंभा त्यांनी मिरवणे निषेधार्ह असून केवळ आणि केवळ जातीचे प्रमाणपत्र वैध ठरावे, किमान तारखांवर तारखा पडून २०२४ उजाडावे म्हणून भाजपाशी त्यांची लगट आहे, असा आरोपही एडतकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –