‘शरद पवारांना दुखावलं नाही तर हजारो लोकांचं आयुष्य चांगलं होणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि  विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

याविषयी खुद्द रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी  राष्ट्रवादी सोडण्याची मनाची तयारी आहे, परंतु युतीच काय होतं हे पाहून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांना या वयात सोडून जाण्याचा विचार करु शकत नाही असं विधान त्यांनी एक वृत्त वाहिनीशी करताना केले होते. परंतु त्यांनी फलटण येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिवसेना प्रवेशावर सूचक विधान केले आहे.

पुढे बोलताना निंबाळकर यांनी ‘शरद पवारांना दुखावलं तर माझ्या आयुष्याचा शेवट चांगला होणार नाही पण शरद पवारांना दुखावलं नाही तर समोरच्या हजारों लोकांचं आयुष्य चांगलं होणार नाही असं विधान केले आहे. तसेच आजचा कार्यकर्ता मेळावा हा त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आहे. यात कुठलाही निर्णय होईलच असं नाही असंही रामराजे निंबाळकर म्हटले आहेत.

दरम्यान ‘कुठलाही राजकीय निर्णय घेण्याच्या आधी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही नेहमीच मतदानाच्या आधी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतो. पक्षात कुठल्या जायचं, पक्ष सोडायचा की नाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही मला दिलेला आहे. पण तरुण पिढीसाठी आपल्याला हे करावं लागणारं आहे असंही त्यांनी म्हटले आहे.