fbpx

मी आमदार खिशात तर खासदार काखेत घेऊन फिरतो, रामराजेंचा उदयनराजेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला  आहे. उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच आहे, अशी टीका रामराजे निंबाळकर यांनी केली आहे.

नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावरून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे, तसेच खासदार रणजित निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता. नीरा देवघरचे पाणी बारामतीकडे वळवण्यात रामराजे निंबाळकर यांनी पवारांना साथ दिली. तसेच त्या भागातील अनेक जमिनी लाटल्या, असा गंभीर आरोप उदयनराजे आणि खासदार रणजित निंबाळकर यांनी केले होते. दरम्यान रामराजे निंबाळकर यांनी या सर्व टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्हाला बांडगुळ म्हणणाऱ्यांनी त्यांच्या आधीच्या छत्रपतींची पिढी आमच्या पिढीनेच सांभाळली याची जाणीव ठेवा. तुमचा आणि माझा दोघांचाही राज्याभिषेक घरातच झाल्याने आपण दोघेही स्वयंघोषित राजे आहोत. मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरलो तर तुमच्या पोटात का दुखतंय, तुम्हीही दोन वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरुन काय केले? असा सवाल रामराजे निंबाळकर यांनी केला.

इतकेच नव्हे तर, मी असे अनेक आमदार, खासदार अंगावर घेतले आहेत, त्यामुळे माजी ऊर्जा वाढतच गेली. आमदार खिशात आणि हे दोन खासदार मी माझ्या काखेत घेऊन फिरतो. असा टोलाही त्यांनी लगावला. याचबरोबर, साताऱ्याच्या राजकीय क्षितीजावर जोवर हे तीन पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, आपल्यावर जमीन लाटण्याचा आरोप करणाऱ्यांनी जवळीमध्ये काय केले हे आम्हाला माहित नाही का? असा सवाल करत एक टन पुराव्याची कागदे आपल्याकडे असल्याचा इशाराही त्यांनी दिला.