रामराजे-उदयनराजे वाद विकोपाला, निंबाळकर समर्थकांकडून फलटण बंद

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांचा पुतळा जाळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नितीन शिंदे , संतोष घाडगे यांना अटक केली आहे. रामराजेंनी उदयनराजे भोसलेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना करत त्यांच्यावर जहरी टीका केली होती. याचेच पडसाद आज उमटताना दिसत आहेत. दरम्यान यानिमित्ताने रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले हा वाद जुना असून साताऱ्यामध्ये पक्षांतर्गत वाद पुन्हा समोर येताना दिसत आहे.

दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर यांचा पुतळा जाळल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात घोषणाबाजी करुन फलटण बंदचे आवाहन केले. या बंदला फलटणकर नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.

पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून रामराजे नाईक निंबाळकर यांचा विजय असोच्या घोषणा देण्यात आल्या तसेचखासदार उदयनराजे भोसले यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.