‘रामलल्लालाही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या’,भाजप खासदाराची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- ‘तंबूत राहाणाऱ्या रामलल्लालाही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या’, अशी मागणी करणारे पत्र उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार हरी नारायण राजभर यांनी अयोध्येच्या जिल्हाधिकाऱ्याला लिहिले आहे.

देशभरात सध्या राम मंदिराचा मुद्दा चर्चिला जात आहे. केंद्रात आणि उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे. असे असताना देखील राम मंदिराचा प्रश्न सुटत नसल्याने या खासदाराने प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या पत्रात ?

‘जिथे रामलल्लांचा जन्म झाला तिथेच सध्या ते राहत आहेत. तंबूला मंदिराचे स्वरुप देऊन त्यात त्यांची पूजा केली जातेय. त्यांच्या डोक्यावर छप्पर नाहीए. सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. थंडी असो, गरमी असो किंवा पाऊस रामलल्ला तंबूत राहतात. सध्या देशातील सरकार हे ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर देत आहे. सरकारने प्रण केलाय की कुणीही घराशिवाय राहू नये. रामलल्लाची ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक घर बांधून द्यावे. जेणेकरून रामलल्लाच्या डोक्यावरही छप्पर येईल’