नेत्यांनी मागितलेले पैसे देणं शक्य नसल्याने राष्ट्रवादी सोडली – रमेश कराड

टीम महाराष्ट्र देशा: बीड–उस्मानाबाद–लातूर विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले रमेश कराड यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते.

कधीकाळी स्व गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जाणारे कराड यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. तर अवघ्या सहा दिवसांमध्ये कराड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत उमेदवारी देखील मागे घेतली, दरम्यान, आता उमेदवारी मागे का घेतली याचा गौप्यस्फोट केला आहे.

निवडणुकीसाठी आपण ठरवलेल्या बजेटपेक्षा अधिक पैसे मागण्यात आले. त्यामुळे आपल्याला ऐनवेळी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याच रमेश कराड यांनी सांगितले आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

तसेच आजवरच्या राजकीय जीवनात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले नाते रक्ताच्या नात्यापेक्षा मोठ असल्याचही कराड यांनी यावेळी सांगितले.