प्रशासन अलर्ट असतानाही नांदेडमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार, दोन इंजेक्शनसह एकाला अटक

नांदेड : संबंध महाराष्ट्रामध्ये रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा असताना शहरामध्ये एका व्यक्तीला ४० हजार रुपयांना दोन इंजेक्शन रविवारी रात्री उशिरा विक्री करताना अन्न व औषधी प्रशासनाने रंगेहात पकडून भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

रविवारी दुपारी डी – मार्टच्या परिसरात एक जण रेमडेसिवीरचा काळा बाजार करत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाला मिळाली होती. या माहितीवरुन सहायक आयुक्त प्रवीण काळे यांनी या भागामध्ये सापळा रचला. अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने बोगस ग्राहकाला पाठवून दिगंबर बाबुराव फुले याला डी मार्टजवळ रंगेहात पकडले. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

दिगंबर हा एक इंजेक्शन २० हजार रुपयांप्रमाणे विक्री करत होता. तर त्याच्या ताब्यातून दोन इंजेक्शन तसेच मोबाइल  असा मिळून एकुण २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषधी प्रशासनाचे औषध निरिक्षक निमसे यांनी या बाबत फिर्याद देखील दिली. या वरुन दिगंबर बाबुराव फुले वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वरुन मराठवाड्यासह संपुर्ण महाराष्ट्रामध्ये रेमिडिसिविर चा तुटवडा असताना नांदेडमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याने प्रशासनासह पोलिस अधिकारी देखिल हादरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या