fbpx

भाजपचे सेनेला संपवण्याचे काम – रामदास कदम

ramdas kadam

सोलापूर  – शिवसेनेची वाढ होईल, या भीतीने केंद्रात १९ खासदार असतानाही सेनेला एकच मंत्रिपद देण्यात आले. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे बोट पकडून राज्यात मोठा झाला. आज भाजप पाठीत खंजीर खुपसून सेनेला संपवण्याचे काम करत आहे, असा आरोप राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचार असल्याची टीकाही केली. रामदास कदम हे सोलापूरला खासगी दौऱ्यावर आले होते.

या वेळी त्यांनी सात रस्ता परिसरातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उपस्थित शिवसैनिकांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, ज्या वेगाने भाजप मोठा झाला त्याच्या दुप्पट वेगाने ती खाली येत आहे. मागील लोकसभेला शिवसेना होती म्हणून लोकांनी भाजपच्या उमेदवारांना जिंकून दिले.

युतीमध्ये शिवसैनिकांनी भाजपचा उमेदवार निवडून यावा, याकरिता जिवाचे रान केले. मात्र त्याच वेळी भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचा उमेदवार कसा पडेल, यासाठीच प्रयत्न केले. हा विश्वासघातच आहे. भाजप नेहमीच शिवसेनेला संपवण्याचे षडयंत्र रचत आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी युती तोडल्याचे जाहीर केले, ते योग्यच असल्याचे कदम यांनी सांगितले.