अटलजी नंतर ज्यांच्या पाया पडावे अशी पावले सापडत नाहीत – रामदास फुटाणे

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.

1988 ची गोष्ट. मुंबईत भाजपाचे अधिवेशन होते. या अधिवेशनात हिंदी कवी संमेलन होते. या कवीसंमेलनात मी सहभागी व्हावे असा आग्रह माझे मित्र सुधीर नांदगावकर यांनी धरला. अटलबिहारीजी कविता ऐकणार होते. तेव्हा मी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचा सदस्य होतो.
अटलजी स्वतः ऐकणार होते. त्यामुळे मी आनंदाने निमंत्रण स्वीकारले. अटलजींनी कटपीस व ऑन तू ले या कवितांना खूप दाद दिली. नंतर नांदगावकरांनी माझी ओळख करून दिली. मी कॉंग्रेस पक्षाचा असल्याचेही सांगीतले.

मी वाकून नमस्कार केला. आशीर्वाद मागीतले अटलजी एक वंदनीय व्यक्तिमत्व होते. मी आजपर्यंत राजकारणातील दोनच व्यक्तींच्या पाया पडलो. एक यशवंतरावजी चव्हाण व दुसरे कवी अटलबिहारी वाजपेयी. आज ज्यांच्या पाया पडावे अशी पावले सापडत नाहीत. अशा भावना कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.

राजकारणातील भीष्म पितामह काळाच्या पडद्याआड