fbpx

…तर ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी – रामदास आठवले

अमृतसर : भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रचार रॅली वर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून असा हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये वाढत राहून लोकशाहीला धोका निर्माण केला जात असेल तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे राज्य सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे देशहीताचे ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. अमृतसर येथे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत रामदास आठवले बोलत होते.

पंजाब मध्ये अमृतसर आणि जालंधर या दोन लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असून अन्य 11 जागांवर रिपाइंचा भाजपला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. अमृतसर लोकसभा मतदारसंघात रिपाइं चे लखमेन्द्र सिंह आणि जालंधर लोकसभा मतदारसंघात रिपाइंचे जसपाल जस्सल या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी रामदास आठवले आज पंजाब दौऱ्यावर आले आहेत.

प्रत्येक पक्षाला प्रचार सभा घेण्याचा अधिकार आहे.निवडणुकीत कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे जनतेचे मतदान ठरवील. मात्र हिंसाचार पसरवून अन्य पक्षांना त्यांच्या प्रचारापासून रोखणे दहशत पसरविणे लोकशाहीला मारक आहे. ममता बॅनर्जी या इतरांना लोकशाहीचे आदर्शवादाचे धडे शिकवितात मात्र स्वतःच्या राज्यात बोकाळलेला हिंसाचार त्या रोखू शकत नाहीत.सर्व देशात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडत आहे . मात्र पश्चिम बंगाल मध्येच हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. संपूर्ण देशात भाजप आणि एनडीए चा विजय होणार आहे.पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस चा पराभव होणार आहे. त्यामुळे पायाखालची वाळू घसरत असल्याचे पाहून ममता बॅनर्जी आणि त्यांचे समर्थक बिथरले आहेत.त्यातून पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचार वाढत असल्याचे सांगून पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी आज अमृतसर मध्ये केली.

पंजाब च्या एकूण 13 जागांपैकी 2 जागा आरपीआय लढत असून 11 जागांवर भाजप ला आरपीआय चा जाहीर पाठिंबा असून पंजाब मध्ये भाजप चे सर्व उमेदवार विजयी होतील तसेच संपूर्ण देशात भाजप एनडीए चा प्रचंड विजय होईल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी आज व्यक्त केला.