निवडून या आणि मंत्रिपद घेवून जा , रामदास आठवले यांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

पुणे: आमच्याकडे निवडून येणारे नेते नाहीत त्यामुळे मंत्रीपद देखील नाहीत. जर कार्यकर्ते निवडून आले तर त्यांना आमच्या कोट्या मधून मंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना मंत्रीपद हवे आहे त्यांनी प्रथम निवडून या आणि मग मंत्रीपद घेवून जा अशी खुली ऑफर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, शिवसेना भाजप युती झाली ही आनंदाची बाब आहे आम्ही स्वतः या युती साठी प्रयत्नशील राहिलो पण आम्हाला सोडून युती करा अस आम्ही म्हणालो नव्हतो. गेली साडेचार वर्ष शिवसेना भाजप विरोधात वक्तव्य करीत आहे तरी देखील आपण त्यांना जवळ केलत पण आम्हाला बाजूला काढलत असा टोला आठवलेंनी भाजपला यावेळी मारला.

आठवले पुढे म्हणाले की, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाईचा पिंपरीत मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आमची ताकद दाखवून देऊ. तसेच महादेव जानकार, सदाभाऊ खोत, यांची बैठक उद्या जाणकारांच्या घरी होणार असून आम्हाला न्याय द्या या मागणीसाठी अमित शहा यांची देखील भेट घेणार आहोत असल्याच आठवलेंनी यावेळी सांगितले.

दरम्यान नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, संगीता आठवले, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण आदी उपस्थित होते.