भाजपची साथ सोडण्याचे आठवलेंचे संकेत

रामदास आठवले

मुंबई- मी १० ते १५ वर्षे काँग्रेससोबत होतो. आता भाजपासोबतही मला तितकाच किंबहूना त्याहून अधिक काळ राहावे लागेल. जोवर सरकार आहे तोवर मी इथेच आहे. नंतर मी हवेचा अंदाज घेऊनच निर्णय घेणार, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सध्या भाजपाला साथ देणारे रामदास आठवले हे आगामी काळात भाजपाची साथ सोडणार की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.

रामदास आठवले हे शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खानही उपस्थित होते. भाषणादरम्यान नसीम खान यांनी रामदास आठवले यांना काँग्रेससोबत येण्याचे आवाहन केले,यावर रामदास आठवले यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले आठवले ?
मी १० ते १५ वर्षे काँग्रेससोबत होतो. आता मी भाजपासोबत असून त्यांच्यासोबतही मला तितकाच राहावे लागेल. जोवर सरकार आहे, तोवर मी इथेच आहे. मी हवा पाहून अंदाज ठरवत असतो. त्यामुळे मी हवा कोणत्या दिशेने जातेय, याचा अंदाज घेऊनच पुढील निर्णय घेईन.