शिवसेनेला आव्हान देण्यासाठी रामदास आठवले सज्ज, दक्षिण-मध्य मुंबईतून लढवणार निवडणूक

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले 2019ची लोकसभा निवडणूक दक्षिण मध्य मुंबईतून लढणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाच्या 61व्या स्थापना दिनानिमित्त 3 ऑक्टोबर रोजी ठाण्यात प्रचंड महामेळावा आयोजित करून रिपाइंचे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. आठवले सध्या महाराष्ट्रतून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. 1998 मध्ये ते दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यानंतर पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. या मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी मतदारसंघात 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप यांची युती होती व युतीद्वारेच सेनेचे राहुल शेवाळे दक्षिण-मध्य मुंबईतून खासदार झाले. त्यामुळे आता २०१९ च्या लोकसभेसाठी युती होणार का, आणि झाल्यास शिवसेना हा मतदारसंघ आठवलेंना सोडणार का, युती न झाल्यास भाजप हा मतदारसंघ आठवलेंना सोडणार का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच