नक्षलवाद्यांनी हिंसक मार्ग सोडून शांततेच्या मार्गाने मुख्यप्रवाहात यावे, आठवलेंचे आवाहन

ramdas aathvale

रायपूर : नक्षलवाद्यांना जर गरीब आदिवासींना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी नक्षलवाद सोडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या लोकशाही च्या ; शांततेच्या मार्गाने देशाच्या मुख्य प्रवाहात यावे नक्षलवाद्यांनी बुलेट चा मार्ग सोडून बॅलेटचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

छत्तीसगढमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 2 उमेदवार लोकसभा निवडणूक लढत आहेत त्यांच्या प्रचारासाठी आयोजित रिपाइं च्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.

छत्तीसगढ मध्ये लोकसभेच्या 11 जागा असून त्यापैकी 2 जागांवर रिपाइं स्वबळावर निवडणूक लढत असून अन्य 9 जागांवर भाजप ला पाठिंबा दिला आहे. छत्तीसगढ मध्ये भाजपच्या यंदा किमान 8 जागा निश्चित निवडून येतील असा अंदाज रामदास आठवले यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील 5 वर्षांत चांगले काम केले असून त्यांना पुन्हा केंद्रात देशसेवेची संधी देण्यासाठी भाजप एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.

नक्षलवाद्यांनी निवडणुकीला विरोध करताना काही भागात कार्यकर्त्यांवर पोलिसांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्याचा निषेध करून रामदास आठवले यांनी नक्षलवाद्यांना मुख्यप्रवाहात यावे असे आवाहन केले.