fbpx

मला मंत्रीपदापेक्षा समाज महत्वाचा – रामदास आठवले

विरार : आंबेडकरी समाजाची पुण्याई असल्यामुळेच मी मंत्रीपदापर्यंत पोहोचलो.सरकार निवडूण आणण्याची ताकद आंबेडकरी समाजात आहे. त्यामुळे मंत्रिपद मोठे नसून समाज मोठा आहे. मंत्रिपदापेक्षा समाज मला नेहमीच महत्वाचा असून सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देऊन आंबेडकरी युवकांना सक्षम करायचे आहे. नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा सक्षम समाज आंबेडकरी समाजाला करायचे आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. विरार येथील म्हाडा ग्राऊंडवर रिपब्लिकन पक्षाच्या वसई विरार जिल्ह्यातर्फे आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ते बोलत होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शासनकर्ती जमात व्हा ; राजकीय सत्ता काबीज करण्याचा संदेश दिला त्यानुसार आपली सर्व समाजाला सोबत घेऊन वाटचाल सुरू आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला निळा झेंडा आणि रिपब्लिकन पक्ष देशभरात पोहोचविला आहे. ईशान्य भारतातील सातही राज्यांत रिपब्लिकन पक्ष पोहोचविण्याचे काम आपण केले आहे.रिपब्लिकन ऐक्यासाठी कोणताही त्याग करायची माझी तयारी आहे. रिपब्लिकन ऐक्याची भूमिका मी मांडत आहे मात्र जे लोक रिपब्लिकन ऐक्याला विरोध करतात त्यांना सोडुन माझ्यावर काही लोक टीका करतात.ज्यांना मंत्री होता येत नाही ते माझ्यावर टीका करतात.असा टोला विरोधी रिपाइं गटाला रामदास आठवलेंनी लगावला.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर केंद्रिय मंत्रीमंडळात भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यानंतर 68 वर्षानंतर त्यांचा भीमसैनिक म्हणून मला केंद्रियमंत्रीपदाचा मान मिळाला आहे.दलितांना संरक्षण देणाऱ्या ऍट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपण घेतली आहे अशी भूमिका ना रामदास आठवलेंनी यावेळी मांडली.

या जाहिर सभेस आंबेडकरी जनतेची प्रचंड गर्दी उसळली होती. रामदास आठवलेंच्या भाषणाला यावेळी आंबेडकरी तरुणांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला.