मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करणारा कायदा संसदेत करा – आठवले

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजासह देशभरातील विविध उच्चवर्णीय समाजातील आर्थिक दुर्बलांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची कमाल मर्यादा 50 टक्क्यांहून 75 टक्क्यांपर्यंत वाढविणारा कायदा संसदेत करावा अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए च्या बैठकीत केली.

दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या एन डी ए सरकार च्या काळात उत्तर प्रदेश चे विभाजन करून नवीन हिंदी भाषिक राज्य निर्माण करण्यात आली आहेत.त्याप्रमाणे अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी. मराठी भाषिक आणखी एक राज्याची निर्मिती स्वतंत्र विदर्भ राज्याच्या रूपाने व्हावी अशी मागणी रामदास आठवले यांनी आज एनडीए च्या घटकपक्षांच्या बैठकीत केली.

देशभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे विरोधी पक्ष संविधान बदलणार असा अपप्रचार करून जनतेत सरकारविरोधात प्रचार करीत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सरकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाचे संरक्षण करणारे सरकार आहे. त्यामुळे विरोधकांना चोख उत्तर देण्याची सूचना रामदास आठवलेंनी आज एनडीए च्या बैठकीत केली.