fbpx

सत्ता कशी मिळवायची ते प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे – रामदास आठवले

सोलापूर / सूर्यकांत आसबे : सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नातू असल्याने मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे़.परंतु सत्ता कशी मिळवावी, हे त्यांनी माझ्याकडून शिकावे, अशी टिप्पणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत केली.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये, मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्याचा फायदा भाजपा – शिवसेनेला होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सर्व जातीच्या नेत्यांना सामावून घेतले असले तरी २००९ च्या माझ्या अनुभवानुसार डोक्यात हवा व पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे जातील. त्यामुळे या आघाडीला राज्यात फारसे यश मिळणार नाही.आपण रिडलोसचा प्रयोग केला होता.त्यावेळी १११ जागेवर निवडणुक लढवून एकही जागा जिंकता आली नाही. असे आठवले यांनी सांगितले.

रिपाइं व वंचित आघाडीचा राजकीय समझोता होऊ शकेल काय ? असे विचारले असता ऐक्याची माझी तयारी आहे, मागे दोन ते तीन वेळा असे प्रयत्न झाले आहेत. मात्र त्यांनी तयारी दर्शवली नाही.दोघे एकत्र आलो तर प्रकाश आंबेडकर मंत्री होतील. रिपाई ऐक्य होत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात दोघेही छाप पाडू शकतो. प्रकाश आंबेडकर याच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे, पण सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे.त्यांनीच आता भाजप-शिवसेनेसोबत यावे असेही आठवले म्हणाले.

२०१२ च्या निवडणुकीत शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांचा फिडबॅक घेतला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी मला काँग्रेसने तुम्हाला काय दिले? असा सवाल केला.काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनवेळा पराभूत केले.त्याच काँग्रेसला पराभूत करण्यासाठी आपली वेगळी ओळख आहे, हे कार्यकर्त्यांनी पटवून दिल्यानंतर मी भाजपासोबत गेलो. काँग्रेसवाल्यांनी भाजप हा जातीवादी पक्ष आहे, असा सातत्याने अपप्रचार केला.

भाजपामध्ये सर्व जातीधर्मांचे लोक निवडून आलेले असल्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व स्मारकाचा विषय मार्गी लावला आहे.शिवाय १० टक्के आरक्षणामुळे दलित आणि सवर्ण यांच्यामधील कटुता कायमस्वरूपी कमी होणार आहे.या निर्णयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.मराठा आरक्षणातही कोणतीही अडचण येणार नाही.