लव्ह जिहाद नावाने होणारा हिंसाचार रोखा – रामदास आठवले

आठवले

मुंबई: हिंदू मुलीवर प्रेम केल्याच्या आरोपातून राजस्थान येथे एका मुस्लिम तरुणाची अत्यंत अमानवी पद्धतिने हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करून लव्ह जिहाद च्या नावाने होणारा हिंसाचार सरकार रोखत आहे. मात्र, असा जातीय आणि धार्मिक भेदभावातून होणारा हिंसाचार समाजाने रोखला पाहिजे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार सर्वधर्म समभावाचा विचार समाजात रुजविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आंतर जातीय विवाह आणि आंतर धर्मीय विवाह सामाजिक भेदभाव मिटविण्यासाठी सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी आवश्यक आहेत . हिंदू मुस्लिम ऐक्य या विषयाला वाहिलेल्या जिवा या सिनेमाची निर्मिती केल्याबद्दल सिनेमाचे निर्माते प्रदीप पायाळ यांचे कौतुक आठवले यांनी केले.

रवींद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटर मध्ये जिवा या सिनेमाचा मुहूर्त आणि पोस्टर चे प्रकाशन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले . यावेळी रिपाइंचे अविनाश महातेकर गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग, तसेच कुमार जित आठवले, निर्माते प्रदीप पायाळ, संजय भिडे, ऍड मंदार जोशी, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाळाराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते