‘भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन सत्तांतराचा चमत्कार होण्याची शक्यता’

ajit pawar-devendra fadanvis

मुंबई : काल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. २०१९ विधानसभा निकालानंतर उदयास आलेल्या महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना रंगणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष्य या निकालाकडे लागलं होतं. पंढरपुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकवला आहे.

त्यानंतर महाराष्ट्रात मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात पश्चिम बंगाल मध्ये ममता दीदींनी केला तसा राजकीय चमत्कार लवकरच होईल असा दावा रामदास आठवले यांनी केला. यापूर्वी एकदा अजीतदादा आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते त्याचा हवाला देत भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुन्हा एकत्र येऊन राज्यात सत्तांतराचा चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगाल मध्ये भाजपचे 3 आमदार होते. या विधानसभा निवडणुकीत तिथे 3 वरून 78 आमदार भाजप चे निवडून आले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये 75 आमदार अधिक निवडून आणणे हे भाजपचे यश आहे.मात्र या निवडणुकीत पश्चिम बंगाल मधून काँग्रेस आणि डावी आघाडी यांचा सुपडा साफ झाला आहे.डाव्या आघाडीने जर मते मिळविली असती तर थोड्या मतांच्या फरकाने हारलेल्या जागा भाजप ला जिंकता येऊन 170 उमेदवार भाजप चे विजयी झाले असते असे विश्लेषण रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

तर, आसाम मध्ये भाजपला पुन्हा बहुमत मिळवून सत्ता स्थापन होणार आहे. तर पोंडीचेरीमध्येही भाजप एनडीएला बहुमत मिळाले आहे. दक्षिणेत कमल हसन या दिगग्ज अभिनेत्याचा भाजपच्या महिला नेत्याने पराभव केला आहे. महाराष्ट्रा सह अन्य राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 3 वरून 78 आमदार निवडून येणे याला अपयश कसे म्हणता? भाजप चे मताधिक्य आणि आणि तब्बल 75 जागा अधिक जिंकून 78 आमदारांची संख्या लाभलेल्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये हे यश लाभले आहे. त्यामुळे देशात आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची लोकप्रियता कायम आहे असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या