fbpx

आठवले हल्ला : रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

ramdas aathvale

टीम महाराष्ट्र देशा : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या झालेल्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे.संपूर्ण राज्यात आंबेडकरी जनतेच्या आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वयंस्फूर्त बंद तसेच निषेध आंदोलन करण्यात आले आहे. रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या हल्ल्यामागे कुणाचे षडयंत्र आहे याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी उद्या सोमवारी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी दिली आहे.

केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांना झेड सुरक्षा असताना त्यांच्या दौऱ्यामध्ये सुरक्षेची कुमक पुरेपूर नेहमी असते असे नाही. जेथे दौरा असतो त्यात तेथे सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्याची असते मात्र अंबरनाथ येथे स्थानिक पोलीस ठाण्याने सुरक्षेत अक्षम्य दुर्लक्ष आणि त्रुटी ठेवली आहे. पुरेसे सुरक्षाबल न पुरवल्याची माहिती शासनाचया निदर्शनास आम्ही आणली असल्याची माहिती अविनाश महातेकर यांनी दिली आहे.

याप्रकरणातील हल्लेखोराच्या पाठीशी कोण आहे याचा तपास पोलिसांनी करावा. तसेच ना आठवलेंना पुरेशी सुरक्षा पुरविण्यासाठी त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी. उद्या रिपाइं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. अशी माहिती अविनाश महातेकरांनी दिली आहे.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुंबईतील मलबार हिल,दादर,वडाळा,बांद्रा चेंबूर घाटकोपर रमाबाई कॉलनी मुलुंड, मालाड,बोरिवली, आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले. तर मुंबई बाहेर अंबरनाथ बंद ठेवण्यात आले तर ठाणे कल्याण,उल्हासनगर, इगतपुरी,नाशिक,पुणे तसेच औरंगाबाद येथे रेल्वे रोको करण्यात आला. वर्धा येथे ही बंद पुकारण्यात आला. सोलापूर, बारामती, सातारा सांगली आटपाडी बीड आदी अनेक जिल्ह्यांत रिपाइं तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.