भाजपकडून काही मिळत नसेल तर आरपीआयमध्ये या; राणेंना आठवलेंची खुली ऑफर

टीम महाराष्ट्र देशा- माजी मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून काही मिळत नसेल तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे. अशी ऑफर देत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री व आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राणे यांना आरपीआयमध्ये आम्ही काही देऊ शकणार नाही, पण त्यांचा मराठा दलित ऐक्यासाठी उपयोग होईल असं ते म्हणाले.

आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असून राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो. तर, उत्तर पूर्वच्या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल असे भाकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मात्र तरीही अडीचशे जागा मिळवून केंद्रात भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे वतीने आज (गुरुवारी) पिंपरीत सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी, आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला विभागाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...