‘जानकारांनी ‘ही’ चूक केली नसती तर बारामतीमधून १५-२० हजारांनी निवडून आले असते’

पंढरपूर :लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण देशभरात सुरु असताना आता महाराष्ट्रात विधानसभेच्या तयारीला लागल्याचे पहायला मिळत आहे. अनेक नेतेमंडळी दुष्काळ दौऱ्याच्या नावाखाली मतदारसंघ तसेच जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दुष्काळ दौऱ्यावर आहेत तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील दुष्काळ दौऱ्यावर निघाले आहेत.पवार यांच्या दुष्काळ दौऱ्यानंतर आठवले हे याच दौऱ्यावर निघाले आहेत.

दरम्यान, दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असलेल्या आठवलेंनी रात्री उशिरा सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील चारा छावणीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यानंतर बोलताना त्यांनी पवार यांची चांगलीच खिल्ली उडवली. ‘शरद पवार मोठे नेते असले तरी यंदा लोकांच्या मनात बारामतीत बदल घडवायचा विचार असू शकतो आणि म्हणूनच बारामती हातची जाणार दिसल्याने पवारांनी मशीनवर टीका सुरू केली आहे,’ असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला.

गेल्या वेळी महादेव जानकर बारामतीमधून थोडक्या मतांनी हरले होते. त्यावेळी त्यांनी कपबशी ऐवजी कमळ चिन्ह घेतले असते तर ते १५-२० हजारांनी निवडून आले असते. एखाद्या मशीनमध्ये घड्याळाला मत दिल्यावर कमळाला जात असेल, पण दुसऱ्या एखाद्या मशीनमध्ये कमळाला दिलेले मत घड्याळाला जात असेल, अशी खिल्ली ही आठवलेंनी उडवली.