‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’ : आठवले

पुणे : आपल्या विनोदी आणि शीघ्र कवितांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची काल एका कार्यक्रमात आपल्या शैलीत स्तुती केली. ‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट अशी २ ओळींची कविता करत आठवले यांनी बापट यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण केली आहे.

काल जिल्हाधिकारी कार्यालयात आठवले आणि गिरीश बापट यांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना ई-कार्ड चे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, डॉ. अमोल म्हस्के आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, औषधांऐवजी, पैशांअभावी एखाद्याचा मृत्यू होऊ नये,यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेमुळे राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गरीबांच्या भल्यासाठी ही योजना असून आपण सर्वांनी गरीबांना या योजनेचा फायदा मिळवून द्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी गरीब आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाच्या योजना असल्याचे सांगून गरीबांपर्यंत या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन केले. आपल्या यशामागे‘एक कार्यकर्ता- दहा लाभार्थी’ हे सूत्र असल्याचे नमूद करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकदिलाने काम करावे, हे एक मिशन आहे,असे समजून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. गरीब माणंसाची सेवा केली तर त्यासारखा आनंद व सुख कशातही नाही, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही सर्वसामान्य जनतेसाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. हा एक फ्लॅगशिप कार्यक्रम होणार असून गरीब माणसांसाठी आशा निर्माण करणारी योजना आहे. 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83 लाख 72 हजार लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यात 4 लक्ष 57 हजार 28 कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल. त्यामध्ये शहरातील 2 लाख 77 हजार 633 तर ग्रामीण भागातील 1 लाख 79 हजार 395 कुटुंबांचा समावेश आहे. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे. या योजनेच्या लाभार्थी डाटा एंट्रीचे राज्यात सर्वात चांगले काम पुणे जिल्ह्यात झाले असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आवर्जून सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापूरकर यांनी सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असल्याचे सांगितले. प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

• केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी आपल्या काही भावना काव्यातून व्यक्त केल्या. पालकमंत्री गिरीश बापटांविषयी ते म्हणाले, ‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’
• ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’बाबत केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, ‘तू आता बरा होशील सजना, कारण सुरु झाली आहे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, भारतकी यह है योजना आयुष्मान, सारे देश का है उसपे ध्यान, गरीबो के भलाई का है एनडीए के पास ग्यान,इसलिए प्रधानमंत्री मोदी है सारे देशकी शान’

हात जोडून विनंती करतो शांततेत आंदोलन करा – बापट

You might also like
Comments
Loading...