पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राम शिंदेंचा ताफा अडवला

Ram-Shinde-

अहमदनगर : नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्न आता तापला आहे. नगर जिल्ह्यातील राहतामध्ये आज शिवसैनिकांच्या रोषाचा सामना आज पालकमंत्री राम शिंदे यांना करावा लागला. शिवसैनिकांनी अहमदनगरचे शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यावेळी शिवसैनिकांनी पाणी वाटप कायदा रद्द करण्याची मागणी केली.

पाणी प्रश्नावरून शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ असताना मराठवाड्याला पाणी देणार नाही, असा पवित्रा यावेळी शिवसैनिकांनी घेतला आहे . मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला नाशिक, नगरच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे . नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशानंतर आता नगर जिल्ह्यातून या निर्णयाला विरोध सुरु झालाय. यावर्षी नगर जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी पेक्षा कमी झाले असून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीय. अशा वेळी जायकवाडीला पाणी देणे आमच्यावर अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.