राष्ट्रवादी कॉंग्रेस राम शिंदेंच्या बंगल्यावर बांधणार जनावरं !

blank

 टीम महाराष्ट्र देशा : ‘चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा,’ असा अजब सल्ला देणारे अहमदनगरचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री  राम शिंदे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जनावरं नेऊन निषेध नोंदवणार आहेत.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत असलेले शिंदे हे पथक जिल्ह्याबाहेर गेल्यानंतर पाथर्डी येथील विश्रामगृहावर आले होते. तेथे काही शेतकरी त्यांना भेटायला आले होते. दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती, पण शहरी भागात अशा छावण्या सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे सांगताना शिंदे यांनी पाहुण्यांकडे (नातेवाईक) जनावरे नेऊन घालण्याचा सल्ला दिला.

त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राजकीय क्षेत्रातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावरही अनेकांनी शिंदेंच्या वक्तव्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडमधील पदाधिकारी शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी जनावरं बांधून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवणार आहेत.