fbpx

बाहेरून डोकावणाऱ्यांना पक्षात थारा नाही ; राम शिंदेंचा सुजय विखेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. दक्षिणची जागा जरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असली तरी याठिकाणी कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे हे इच्छुक असून जागा कॉंग्रेसला न सुटल्यास पक्ष बदलण्यास देखील ते तयार असल्याचं बोलल जात आहे. मात्र विखेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पूर्ण विराम दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी बाहेरच्या पक्षांतील अनेकजण डोकावत आहेत. मात्र, उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीनेच ठरणार आहे. त्यानुसार विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा संधी मिळणार आहे. त्यामुळे बाहेरच्या उमेदवारांना भाजपात थारा दिला जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदींची उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारी असणार आहे का असा प्रश्न राम शिंदेंना विचारला असता ते म्हणाले, नगरमधून निवडणूक लढविण्यासाठी भाजपातील अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असणे गैर नाही. तसेच नगर मतदारसंघातून भाजपाची वा मित्रपक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी वेगवेगळ्या पक्षांतील अनेकजण प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर पक्षात डोकावणाऱ्या बाहेरच्या उमेदवारांना मात्र थारा दिला जाणार नाही. दरम्यान, विद्यमान खासदार गांधी यांच्या उमेदवारीवर मात्र पालकमंत्री शिंदे यांनी एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले असच म्हणावे लागेल .