‘लोकसभेच्या निकालानंतर कळेल, लोकं आमच्यावर नाराज आहेत की नाही’

पुणे : पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला आहे. आता शरद पवार यांचे दुसरे नातू असणारे रोहित पवार यांनी देखील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत पवार यांनीच जामखेडमधून आपली तयारी सुरु असल्याचे अप्रत्यक्षपणे याबद्दलचे संकेत दिले.

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, मागील अनेक दिवसांपासून त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात संपर्क वाढवलेला आहे. त्यामुळे रोहित हे कर्जतमधून विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आजवर त्यांनी जाहीरपणे बोलणे टाळले होते. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आपण विधानसभा लढणार असून कोणत्या मतदारसंघातून लढायचं हे वरिष्ठ नेते ठरवतील. असे उत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.दरम्यान याच पत्रकार परिषदेत विकासकामांच्या मुद्द्यावरून पवार यांनी भाजपवर हल्ला चढविला.

रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात चाचपणी करत आहेत. इथे त्यांनी पाण्याचे टँकरही सुरु केले आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, जामखेड हा विधानसभा मतदारसंघ नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा आहे. आम्ही यासंदर्भात राम शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना राम शिंदे म्हणाले, निवडणुकीत कुणी कुठून उभा राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नगरमध्ये विकासकामे झाली कि नाही हे तिथे गेल्याशिवाय लक्षात येणार नाही आणि लोकसभेच्या निकालानंतर कळेलच कि लोकं आमच्यावर नाराज आहेत कि नाही.ते आता आता नव्याने या मतदारसंघात येत आहेत मात्र ते आता या मतदार संघात येणार असल्याने लोकं खुश आहेत का ? त्यांनी कामे काय केली? आम्ही कामे कमी केली असतील मात्र अजिबातचं कामे केली नाहीत असं तर नाही ? असं ते म्हणाले.