राम कदमांची साडेसाती संपेना ; आता केलं सोनाली बेंद्रेच्या निधनाचे ‘फेक’ ट्विट

टीम महाराष्ट्र देशा – गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भाजप आमदार राम कदम यांच्या संकटांमध्ये आता नव्याने भर पडली आहे. वादग्रस्त वक्तव्याने मुक्ताफळं उधणाऱ्या राम कदम यांच्या ट्विटमुळे आता ते अडचणीत आले आहेत. परदेशात उपचारासाठी गेलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाचं ट्विट त्यांनी केलं

‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

हे ट्विट चुकीचं असल्याचं लक्षात येताच ते डिलीट करण्यात आलं पण, स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मात्र सध्या ते बरंच व्हायरल झालं असून, आता त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे.

दरम्यान, सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेत आहे. मात्र, सोनालीची प्रकृती चांगली आहे. काही दिवसांपूर्वीच सोनालीने ट्विटरवरून स्वत:चे काही फोटोही शेअर केले होते. एकूणच सोनाली बेंद्रे तिच्यावरील उपचारांना व्यवस्थितपणे प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.

त्यांच्या या ट्विटनंतर चांगलीच खळबळ माजली. आपली चूक लक्षात आल्यानंतर राम कदम यांनी तात्काळ आपले ट्विट डिलिट केले. त्यानंतर राम कदम यांनी सारवासारव करणारे ट्विट केले. सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो’ असे ट्विट त्यांनी केले.