यातून कॉंग्रेसच्या डोक्यात दुकानदारी किती ठासून भरली आहे? हेच दिसून येते.

sachin sawant, ram kadam and devendra fadnvis

मुंबई : नद्या स्वच्छ करण्यात जर काँग्रेसला व्यवसाय दिसून येत असेल, तर त्यांच्या डोक्यात व्यवसाय आणि दुकानदारी किती ठासून भरली आहे? हेच दिसून येते. काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीच्या व्हिडीओत झळकतात, त्या पद्धतीचा हा व्हिडीओ नाही. त्यामुळे स्वत:चे आत्मपरिक्षण करणे सोडून, चांगल्या गोष्टींना विरोध करण्याचं काम काँग्रेसकडून सुरु असल्याची घणाघाती टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी नदी बचाव मोहिमेसाठी केलेल्या व्हिडीओवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन किंवा जनसंपर्क संचलनालयाचा कुठेच उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा टी-सिरीज कंपनीशी कोणता करार झाला आहे का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला होता.

काय आहे नेमकं प्रकरण
नद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धनाचं आवाहन करण्यासाठी ‘मुंबई रिव्हर अँथम’ ही संगीत-चित्रफित तयार करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे. ही संगीत चित्रफित दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आली. विशेष म्हणजे यात अमृता यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अभिनय केला आहे.

यु-ट्यूबवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी अभिनय केला आहे. मुंबईत पूर्वीच्या काळी असणाऱ्या नद्या आणि सध्या त्यांचे होत असलेले प्रदूषण यावर ‘रिव्हर अँथमच्या’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

1. टी सीरीज या कंपनीशी शासनाचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबिक नाते आहे? यामधील आदान प्रदान काय आहे?

2. सदर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शासन अथवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे शासनाचा सदर कंपनीशी करार झाला आहे का? असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा.

3. जर शासनाशी संबंध असेल तर हीच कंपनी का निवडली, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवली गेली?

4. मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अधिकाऱ्यांनी या व्हिडीओसाठी मानधन घेतले आहे का? कलाकारांचे मानधन कोणी दिले? आणि या व्हिडीओचा खर्च कोणी केला?

5. शासकीय अधिकाऱ्यांना सदर व्हिडीओमध्ये काम करण्याचे आदेश कोणी दिले? सदर काम त्यांच्या कार्यकक्षेत येते का?

6. वर्षा हे शासकीय निवासस्थान चित्रीकरणासाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली?

7. सदर व्हिडीओ खासगी असेल तर अशा खासगी प्रकल्पात अधिकाऱ्यांनी स्वखुशीने काम केले की, त्यांना काम करण्याचे आदेश दिले?

8. स्वतःच्या अतिव्यस्त कार्यक्रमातून व अतिमहत्त्वाच्या जबाबदारीतून वेळ काढून मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी या व्हिडीओच्या चित्रीकरणासाठी वेळ दिला तसेच इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांचे काम बाजूला ठेवून यामध्ये समाविष्ट केले गेले. याचा अर्थ सदर व्हिडीओच्या माध्यमातून मुंबईच्या नदीसारखे जटील प्रश्न सोडवले जाऊ शकतात अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे का?

9. असल्यास राज्यात 13 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळ्या लावाव्या लागल्या. अशा व बेरोजगारी, कुपोषण, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढलेली महागाई इत्यादी सारख्या महत्त्वाच्या विषयांवर शासन असेच व्हिडीओ बनवणार आहे का?

10. अशा व्हिडीओमध्ये काम करण्याकरता त्या-त्या विषयाशी संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांना अभिनयाचे व नृत्याचे प्रशिक्षण सरकार देणार आहे का?

राम कदम यांचा पलटवार

राम कदम यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सांगितलंय की,हा व्हिडीओ टी-सिरीजने तयार केलेला नाही. त्यांचे युट्यूब सबस्क्रायबर अधिक असल्याने, त्यांनी तो युट्यूब अपलोड केला असल्याचं स्पष्टीकरण भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिलं आहे. तसेच, या व्हिडीओसाठीचा सर्व खर्च रिव्हर मार्चने केला आहे. त्यासाठी कंपनीची निवड शासनाने केली नसल्याने शासनातर्फे एकही रुपयादेखील खर्च केला नाही. मुंबईतील नद्या स्वच्छ करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या वतीने एक अभियान हाती घेण्यात आले होते. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या  अनेक सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली. त्यासंदर्भात एक बैठक वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त अजोय मेहता हे सुद्धा सहभागी झाले होते. या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संघटनांसोबत रिव्हर मार्च सुद्धा त्यात सहभागी होते.

2012 पासून नद्या स्वच्छ करण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या  रिव्हर मार्चच्या माध्यमातून जनजागृतीसाठी एक व्हिडीओ तयार करण्याची संकल्पना पुढे आली. तसेच या व्हिडीओतून नद्या स्वच्छतेचा संदेश स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिला, तर तो लोकांना अधिक भावेल, अशी कल्पना मांडली गेली.

या व्हिडीओसाठीचा सर्व खर्च रिव्हर मार्चने केला असल्याचे सांगून राम कदम पुढे म्हणाले की, कंपनीची निवड शासनाने केली नाही. त्यामुळे शासनातर्फे एकही रुपया यावर खर्च करण्यात आलेला नाही. तेव्हा डीजीआयपीआर आदींचा संबंध येत नाही. शासकीय अधिकारी स्वेच्छेने यात सहभागी झाले असून नद्या स्वच्छ करण्यात जर काँग्रेसला व्यवसाय दिसून येत असेल, तर त्यांच्या डोक्यात व्यवसाय आणि दुकानदारी किती ठासून भरली आहे? हेच दिसून येते. काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीच्या व्हिडीओत झळकतात, त्या पद्धतीचा हा व्हिडीओ नाही. त्यामुळे स्वत:चे आत्मपरिक्षण करणे सोडून, चांगल्या गोष्टींना विरोध करण्याचं काम काँग्रेसकडून सुरु आहे.