पार्थसाठी पवार फॅमिली करतेय जीवाचे रान ; भर उन्हात अजित पवारांची रॅली

पुणे : मुलगा पार्थ पवार याच्या प्रचारासाठी पवार फॅमिली जिवाचे रान करताना सध्या दिसत आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्ष्याचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातून आज रविवारी भर उन्हात दुचाकी रॅली काढण्यात आली.

ज्याप्रकारे निवडणुका जवळ येत आहेत त्याप्रकारे सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. आज निगडीच्या भक्ती शक्ती शिल्पाचा आशीर्वाद घेऊन अजित पवार आणि पार्थ पवार यांनी रॅलीला सुरुवात केली. यावेळी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवार आणि पार्थ हे दोघे एकाच जिप्सी मधून रॅलीत सहभागी झाले. रस्त्याने प्रत्येक व्यक्तीला अजित पवार हे नमस्कार करत होते.

दरम्यान, अजित पवार यांनी सुपुत्र पार्थसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. पार्थची आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार, भाऊ जय पवार आणि चुलत भाऊ रोहित पवार आणि अजित पवार यांची बहीण हे सर्व पिंपरी-चिंचवड मध्ये बैठका घेत असून पार्थचा प्रचार करत आहेत. यावरून पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. आता हि मेहनत किती कामात येते हे निवडणूक झाल्यानंतरचं समजेल.