गुन्हा मागे घेतला नाही महाराष्ट्रभर आंदोलन ; भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चा

सांगली : भीमा कोरेगाव येथे झालेली हिंसाचाराचे पडसाद आता राज्यासह देशभरात उमटत आहेत. या हिंसाचाराला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडे यांना जबाबदार धरत जोरदार आरोप केले आहेत. याचाच निषेध श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने सांगली मध्ये करण्यात आलाय.
याकूब मेमनशी तुलना करून भिडे गुरुजींवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची जी मागणी करण्यात आलीय, त्याचा यावेळी कार्यकर्त्यांनी निषेध केला. गुन्हा मागे घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.

बुधवारी सांगली बंदवेळी मारुती चौकात संभाजीराव भिडे यांचे पोस्टर फाडण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघत असल्याने मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. बंदच्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करु, असा इशारा शिवप्रतिष्ठानने पोलीस आणि प्रशासनाला दिला.