राजू शेट्टी यांच्याकडून केवळ प्रसिध्दीसाठीच टीका- सदाभाऊ खोत

राजू शेट्टींना

सांगली : केवळ प्रसिध्दीसाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आपल्यावर टीकाटिप्पणी करीत आहेत. मात्र त्यांनी स्वतःच्या सभोवतालच्या स्वीय सहाय्यक व बगलबच्च्यांचा कारभार पहिला बघावा, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांच्यात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे. आपला विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरताना राजू शेट्टी स्वतः पुढे होते. मग कोणत्या तोंडाने ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विश्‍वासघात केल्याचे सांगत आहेत. त्यांना त्यावेळी विश्‍वासघात झाल्याचे समजले नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करून केवळ राजकीय दुकानदारी सुरू ठेवण्यासाठीच राजू शेट्टी यांची सध्या धडपड सुरू असल्याचा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला. आत्मक्लेश यात्रा काढताना भाजपला पाठिंबा दिल्याचा पश्‍चात्ताप होत आहे, असे सांगणा-या राजू शेट्टी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारालाच पाठिंबा देत मतदान केले आहे. ही शेतक-यांच्या डोळ्यात धूळफेक नव्हे काय? जे राजू शेट्टी महात्मा जोतिबा फेले यांना फसवितात, ते सर्वसामान्य शेतक-याबाबत कसे वागत असतील? कोणत्याही कार्यकर्त्याला मोठे होऊ द्यायचे नाही, केवळ स्वार्थ साधायचा व राजकीय वापर करून फेकून द्यायचे, हीच राजू शेट्टी यांची रणनिती आहे. यापूर्वी त्यांनी रघुनाथ पाटील व आमदार उल्हास पाटील यांचाही अशाच पध्दतीने राजकीय वापर केला. राजू शेट्टी यांना आजही केंद्र अथवा राज्यातील सत्तेतून बाहेर पडायचे नाही. केवळ सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळातून बाहेर काढायचे आहे. आपल्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीतील सदस्यांची आपली चौकशी करण्याची पात्रता नसतानाही आपण चौकशीसाठी सामोरे गेलो. वास्तविक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आपणाला बाहेर पडायचे नव्हते. राजू शेट्टी यांना आजवर आपण केलेल्या योगदानाचा निश्‍चितच विसर पडला आहे. आता केवळ येत्या ऊस गळीत हंगामापर्यंत आपल्यावर नाहक टीकाटिप्पणी करून त्यांना प्रसिध्दी मिळवायची आहे. त्याआधारे सर्वसामान्य शेतक-यांच्या भावनेला पुन्हा हात घालायचा व हात वर करून ऊसदर दिला नाही म्हणून परत निवडणुकीला सामोरे जायचे, हीच राजू शेट्टी यांची आगामी रणनिती आहे, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.