कधीकाळी एकाच काठीने सरकारवर हल्ला करणारे खा राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज एकमेकां विरोधात उभे ठाकले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणारा हा संघर्ष आज थेट दगडफेक आणि कार्यालय फोडण्यापर्यंत पोहचला आहे. सकाळी सोलापूरमधील कुर्डूवाडी येथे काही संतप्त शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांची गाडी फोडली, तर याचे प्रत्युत्तर म्हणून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य शेट्टी यांचे कार्यालय फोडले आहे.
नेमक काय घडल
सदाभाऊ खोत हे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कुर्डूवाडी येथील टोल नाक्यावरून बार्शीच्या दिशेने जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर शेतातील गाजरे, मक्याची कणसे फेकून मारण्यात आली. यामध्ये सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान झालं आहे.
आता राजू शेट्टींना राज्यात फिरून देणार नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता स्वाभिमानीचे अध्यक्ष खा राजू शेट्टी यांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेकडून देण्यात आला आहे. याचेच पडसाद राज्यभरात दिसून येत असून इस्लामपूर येथे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडले. खासदार शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे व झेंड्यांचे दहन करण्यात आले आहे